नागपूर Nagpur Double Murder : नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. उत्कर्ष डाखोळे (25 वर्ष) या अभियांत्रिकी विद्यार्थ्यानं करिअरवरून मतभेद झाल्यामुळं त्याच्या पालकांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा 26 डिसेंबर रोजी घडला होता, परंतु बुधवारी शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आलीय.
"थंड डोक्यानं आई-वडिलांची निर्घृण हत्या करणाऱ्या निर्दयी मुलाला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. त्यानं केलेला गुन्हा त्याच्या लक्षात आला असला, तरी त्याला कठोर शिक्षा होईल. कारण पोलिसांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यास सुरुवात केलीय".- निकेतन कदम, पोलीस उपायुक्त
सात दिवसांनी खून प्रकरण उघडकीस : आरोपीने कुणालाही घराजवळ येऊ दिले नाही : आरोपी उत्कर्ष डाखोळेनं आई-वडिलांची हत्या केल्यानंतर बहीण, नातेवाईक, शेजाऱ्यांना घराजवळ येऊ दिलं नाही. यासाठी तो सदैव सतर्क असायचा. आपल्या बहिणीला संशय येऊ नये, म्हणून त्यानं 27 डिसेंबर रोजी वडिलांच्या मोबाईलवरून बहिणीला मेसेज पाठवला होता. त्यानंतर तब्बल सात दिवसांनी हे खून प्रकरण उघडकीस आलं.
असा आहे संपूर्ण घटनाक्रम : 26 डिसेंबर रोजी आरोपी उत्कर्ष डाखोळेनं सर्वप्रथम आईची हत्या केली. त्यावेळी त्याचे वडील घरी नव्हते. वडील घरी परतल्यानंतर त्यानं वडिलांचा भोसकून खून केला. उत्कर्षनं 26 डिसेंबरला त्याची बहीण कॉलेजला गेली असताना आई-वडिलांची हत्या केली. मात्र, ती घरी परतल्यावर आई-वडील ध्यानासाठी बंगळुरूला गेल्याचा बनाव त्यानं रचला होता. त्यानंतर त्यानं बहिणीला काकाच्या घरी सोडून दिलं.
आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी : मात्र, आरोपीची बहीण वारंवार वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यानं आरोपी उत्कर्ष डाखोळेनं युक्ती लढवली. त्यानं वडिलांच्या मोबाईलवरून बहिणीच्या मोबाईलवर मेसेज केला. मेसेजमध्ये आम्ही 5 जानेवारीला नागपूरला परतणार आहोत, असं सांगितलं. त्यामुळं मुलीनं पुन्हा वडिलांशी संपर्क केला नाही. 26 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान आरोपीनं कोणालाही घराजवळ येऊ दिलं नाही. मात्र, लीलाधर डाखोळे यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे यांचे मृतदेह घरात आढळून आले. कपिल नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असता, त्याने आपल्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. त्यानं पोलिसांना हत्येचं कारण सांगितल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.
'या' काणामुळं केली हत्या : आरोपी उत्कर्ष डाखोळे इंजिनिअरिंगच विद्यार्थी होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो इंजिनिअरिंग पूर्ण करू शकला नाही. त्यामुळं आई वडिलांनी त्याला अन्य दुसऱ्या कोर्समध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळं आरोपी उत्कर्ष बेचेन होता. त्याचं रागातून उत्कर्षनं आई-वडिलांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. तसंच आई-वडिलांनी आरोपीला शेती किंवा अन्य व्यवसाय करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळं देखील त्याला पालकांचा राग होता. यातूनच त्यानं थंड डोक्यानं पालकांना संपवलंय.
हे वाचलंत का :