ठाणे - रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने वाद झाला. त्यामध्येच तीन तरुणांवर धारदार चॉपरने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. डोंबिवलीतील शेलार चौकात ही घटना घडली.
डोंबिवली पूर्व शेलार नाका इंदिरानगर येथे राहणारे प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे हे तिघे दुचाकीने सोमवारी रात्रीच्या सुमारास दावडीच्या दिशेने घराकडे परतत होते. यावेळी रवी लगाडे याची रिक्षा रस्त्यात उभी असल्याने प्रतीकने रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे प्रतीकचा रवी लगाडे याच्याशी वाद झाला. याच वादातून रवी लगाडे, रमेश घोरणाळ, चंदया जमादार यांनी प्रतीक आणि त्याच्या दोन मित्रांना शेलार नाका येथे गाठले. तसेच प्रतीकला बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला. प्रतीकच्या मदतीसाठी गेलेले त्याचे मित्र बाली जयस्वार, निलेश धुणे यांच्यावर शस्त्राने हल्ला केला.
हल्ल्यात तिघेही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात प्रतीकला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ, चंदया जमादार, रवी लगाडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस अधिकारी नारायण जाधव यांनी सांगितले.