ठाणे - जेवणाच्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना अंबरनाथ शहरातील गायकवाड पाड्यात घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गोंडाणे या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर-५ येथील गायकवाड पाड्यात आरोपी सचिन गोंडाने पत्नी व दोन लहान मुलांसह राहतो. काल दुपारी जेवणाच्या वादातून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. रागात असलेल्या आरोपी पतीने सायंकाळच्या सुमाराला पत्नीला मारहाण करून ओढणीने घरातील लोखंडी ग्रीलला बांधले. त्यानंतर त्याने घरातील दगडी पाटा उचलून पत्नीच्या डोक्यात मारला. दगडी पाट्याच्या जोरदार फटाक्यांमुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी सचिनचा भाऊ घरी आल्याने, हा सर्व प्रकार उघड झाला. शिवाजीनगर पोलिसांनी घटनस्थळी येवून पंचनामा केला. मृत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सचिनला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.