ठाणे- महापालिका महापौरांना फोनवर दाऊदचा हस्तक असल्याचे सांगून फोन येत होते. यामध्ये आरोपी महापौरांना फोन करून धमकावत होता. पोलिसांनी त्याला पकडले आहे. आरोपीचे वसिम सादिक मुल्ला असे नाव आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. त्याच्या सखोल चौकशीत तो विक्षिप्त असून त्याचा दाऊद किंवा टोळीशी कुठलाही सबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा- MAHA VIDHAN SABHA : एकही महिला आमदार न झालेली निवडणूक.. शिवसेनेचा चंचूप्रवेश व सहकार चळवळीचा पाया
गेल्या १७ सप्टेंबरला दाऊदचा हस्तक बोलतोय म्हणून ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकावण्यात आले. मात्र, धमकावणाऱ्याला महापौर शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर खंडणी विरोधी पथकाने मोबाईल क्रमांकावरून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपीची कसून चौकशी केली. त्याच्या सिमची आणि त्यामधील संभाषणाची तपासणी केल्यानंतर हा भामटा असल्याचे समोर आले असल्याचे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथीमिरे यांनी सांगितले. आरोपी वासिम सादिक मुल्ला हा विक्षिप्त प्रवृत्तीचा असून त्याचा दाऊदशी किंवा त्याच्या टोळीशी कुठलंही संबंध नाही. त्याने फोननंबर हा गुगलवरुन शोधून काढला होता. दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत चौकशी नंतर खंडणी विरोधी पथकाने कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात नेले. त्यानंतर आरोपी मुल्ला याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.