ठाणे : पावसाळ्यात ठाणे आणि लगतच्या प्रदेशातून सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते आणि महामार्ग कापण्याची खात्री न केल्यास सरकारी विभाग आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी रविवारी दिला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा झालेल्या आढावा बैठकीत हा इशारा देण्यात आला. सर्व यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून रस्ते दुरुस्त करावेत. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच बीएमसी पाईपलाईन रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी मुंबई महापालिकेला दिले.
पावसाळ्यातील खड्ड्यांची समस्या : पावसाळा, खड्डे आणि रस्ते यांचे खूप घनिष्ठ नाते आहे. पावसाळा सुरू झाला की, रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण होते. या खड्डयांमुळे अपघातांच्या प्रमाणात देखील प्रचंड वाढ होते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपोआप निर्माण होतो. अनेकांना या अपघातांमध्ये आपले जीव गमवावे लागतात, तर बरेचजण गंभीर जखमी होतात. रस्ता बांधणीचे दोन प्रकारांत वर्गीकरण होते. एक प्रकार म्हणजे काँक्रीट रस्ता आणि दुसरा प्रकार म्हणजे डांबरी रस्ता होय. काँक्रीट रस्ते बांधणीचा खर्च हा डांबरी रस्त्याच्या तुलनेत अडीच ते तीन पट जास्त असतो.
वाहतुकीची वर्दळ खड्ड्यांमुळे कमी : खड्डे हे रस्त्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी मोठे विघ्न आहे. वाहतुकीची वर्दळ खड्ड्यांमुळे कमी होते. सदोष बांधकामे व डागडुजीतील निष्काळजीपणा ही या परिस्थितीला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. रस्त्यांचा मुळात पायाच कच्चा असल्यास, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक झाल्यास, डांबर आणि सिमेंटच्या योग्य प्रमाणाचा अभाव असल्यास रस्त्यांवर खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्डे बुजवताना पावसाळी डांबराचा वापर झाला पाहिजे. जेणेकरून रस्ते दीर्घकाळ टिकतील. अधिकार्यांनी आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहून काम केले, तर रस्त्यांना खड्डे पडणार नाही.