ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका यंत्रमाग व्यवसायाला चांगलाच बसला आहे. सध्या देशासह राज्यभर अनलॉक करण्यात आला आहे. तरीही लॉकडाऊन काळात झालेले हजारो परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे तसेच मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा बंदमुळे भिवंडीतील यंत्रमाग नगरीच्या धडधडीवर याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनपूर्वी यंत्रमाग नगरीत २४ तास धडधड सुरू असायची, मात्र अनलॉकनंतर लोकल बंद व कामगारांच्या कमतरतेमुळे १२ तासच यंत्रमाग कारखाने सुरू आहेत. यामुळे यंत्रमाग व्यवसाय डबघाईला जाण्याची भीती यंत्रमागधारकांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या स्थितीत यंत्रमागनगरीत केवळ 50 ते 60 टक्के यंत्रमाग व्यवसाय सुरू आहेत. मात्र, कामगारांचा दिवसभराचा खर्च सोडवता यावा, यासाठी फक्त एकाच शिफ्टमध्ये हे यंत्रमाग सुरू आहेत. कापड उद्योगांचे मँचेस्टर त्याचबरोबर, कापड उद्योगांचे माहेरघर म्हणून भिवंडी शहर देशभर प्रसिद्ध आहे. कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणत असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला होता. एकेकाळी देश विदेशातील मोठ-मोठ्या बाजारपेठांवर अधिराज्य गाजवलेला भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय मात्र लॉकडाऊनमुळे पुरता डबघाईला आला आहे.
कोरोना संकटाआधीही 2007 साली म्हणजे साधारणतः तेरा वर्षांपूर्वी भिवंडीत वीजवितरण व वीजबिल वसूल करण्याचा ठेका टोरंट पावर या खासगी कंपनीला देण्यात आला. येथूनच शहरात असलेल्या या व्यवसायाला खरी उतरती कळा लागली. महावितरणच्या काळात या यंत्रमाग कारखान्यांना जे वीजबिल यायचे तो टोरंट पावरच्या काळात तिप्पट-चौपट वाढला. विशेष म्हणजे, वीजवितरण खासगी कंपनीकडे गेल्याने वीज चोरी थांबली, हे जरी खरे असले तरी छोटा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला. आर्थिक कोंडीत सापडलेल्या व बंद होत असलेल्या व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या, मात्र छोट्या व्यापाऱ्यांना या योजनांचा हवा तसा उपयोग झाला नाही.
कोरोना संकटाने या यंत्रमाग व्यवसायाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंत्रमाग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, यंत्रमाग मजूर परप्रांतातील आपल्या मुळगावी गेल्याने सध्या मजुरांअभावी येथील यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंदच असल्याने यंत्रमाग व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मुबंईतील काळबादेवी परिसरात कपडा खरेदी विक्रीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याच कपडा बाजारात भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यातील कपडा दलालामार्फत विक्री केला जातो. मात्र, लोकल सेवा बंद असल्याने अर्ध्याहून अधिक कपडा खरेदीदार व दलाल बाजारपेठेत येत नाहीत. त्यामुळे अनलॉककाळात तयार झालेला कपडा विकायचा कुठे? असा नवा प्रश्न यंत्रमागधारकांना पडला आहे.
कामगारांचा रोजचा खर्च भागवता यावा यासाठी फक्त एका शिफ्टमध्ये सध्या शहरात ६० टक्के कारखाने सुरू आहेत. कोरोना संकटामुळे भिवंडीतून कापड प्रक्रियासाठी राजस्थान, सुरत, अहमदाबाद येथे जाणारा कच्चा माल ट्रान्सपोर्ट अभावी कारखान्यातच साठवण्याची वेळ आली आहे. त्यातच यंत्रमागाबाबत शासनाचे कोणतेही धोरण अद्यापही निश्चित नसल्याने त्याचाही फटका यंत्रमाग व्यवसायाला बसला आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली आहे.