मीरा भाईंदर(ठाणे) - शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ३० जूनला मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ विजय राठोड यांनी परिपत्रक काढून १ जुलै ते १० जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. परंतु, शहरात गेल्या १० दिवसात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत राहिली. त्यामुळे पुढील १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहील, असे परिपत्रक आज(१०जुलै) प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० जूनपासून ९ जुलै या कालावधीमध्ये लॉकडाऊन असताना मीरा भाईंदर शहरात १८३७ रुग्ण आढळून आले. तर, या १० दिवसात ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. टाळेबंदी असताना धक्कादायक आकडेवारी समोर आल्यामुळे प्रशासनाने पुन्हा पुढील ८ दिवसांचा लॉकडाऊन कायम करण्यात आला आहे. शहरात लॉकडाऊन असताना रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसून आले.
शहरातील किराणा, भाजी मंडई, मटण विक्रीवर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे. केवळ दूध विक्रेत्यांना सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु, प्रशासनाने घरपोच सुविधांना सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊनचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.