ठाणे - भिवंडी शहरात विविध ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून हातगाड्यांवर व्यवसाय थाटला आहे. आता याच अनधिकृत फेरीवाल्यांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्व. सविता जगताप मार्केटमध्ये या फेरीवाल्यांना गाळे देण्यात येणार आहे. या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा - फेसबुकवर पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या
भिवंडीतील नझराना सिनेमा येथील सुभाष मैदान समोरील नाल्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांनी निवासी इमारतींमधील नागरिकांचा रहदारीचा रस्ता व्यापून टाकला आहे. असे असताना याच परिसरात २००७ मध्ये स्व. सविता जगताप मार्केट उभारण्यात आले. त्यामध्ये तब्बल १७२ ओटे ( बसण्यासाठी जागा ) आहे. रस्त्यावरील भाजी विक्रेत्या महिलांना हे ओटे दिले जाणार होते. त्यांचे पुनर्वसन अद्याप बाकी असताना याच मार्केटमध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना पालिका गाळे देणार आहे.
हेही वाचा - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला
या निर्णयाला विरोध दर्शवत मंगळवारी स्थानिकांनी आंदोलन केले. समाजसेवक शरद पाटील यांनी या नागरिकांची आंदोलनस्थळी भेट घेतली. महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी, लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हे करत असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला.
हेही वाचा - कल्याणमध्ये मित्राच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणाचा खून