ठाणे - देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडण्यासाठी गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. या घटनेत एका अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी जखमी झाले असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दारू माफियांविरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमधून काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती कल्याण एक्साईजचे अधिकारी सुनील कणसे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित कारची तपासणी करत कारचालकाला ताब्यात घेऊन आपल्या कार्यालयात जाण्यास निघाले; मात्र कार्यालयासमोरच येताच आठ ते दहा अज्ञात हल्लेखोर दारू माफियांनी त्यांची कार अडवून ‘तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच भेटतो का’ असे विचारत काठी आणि लोखंडी सळीने पथकावर प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या हल्ल्यात अधिकारी सुनील कणसे यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले, तर या सर्व झटापटीत टोळक्याने कारचालकाला घेऊन पोबारा केला. हल्ला करणाऱ्या टोळीतील तीन जणांना उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.