ठाणे: सरकारी वकील ॲड. कदम्बिनी खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नराधम बाप हा पत्नी आणि दोन मुलांसह कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. पीडित अल्पवयीन मुलगी दोन वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर पीडित मुलगी पाच वर्षांची झाल्यापासून आरोपी नराधम बापाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता; मात्र पीडित मुलगी वेळोवेळी नराधम बापाला विरोध करीत होती. तो तिला मारहाणही करायचा. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलगी १० वर्षांची होईपर्यंत नराधम बापाचे पाच वर्षे तिच्यावर अत्याचार सुरू होते. सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलीला असह्य त्रास होत होता; परंतु नराधम बापाच्या मारहाणीला घाबरून ती कोणाला काही सांगू शकत नव्हती.
बापाविरुद्ध तक्रार: दरम्यान, पीडित मुलीने एक दिवस धाडस करून कल्याण पोलीस ठाणे गाठले आणि बाप करीत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलीस ठाण्याच्या पोहचण्यापूर्वीच नराधम बापाने तिची समजूत घालून मी पुन्हा आता अत्याचार करणार नाही, असे सांगून पीडित मुलीला घरी परत आणले; मात्र काही दिवसांनी पुन्हा तिच्यावर नराधम बापाने लैंगिक अत्याचार सुरू केले. त्यातच सततच्या अत्याचारामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये पीडित मुलगी पोटदुखीमुळे अस्वस्थ झाली होती. त्यावेळी नराधम बाप घरात नसल्याचे पाहून तिने नोव्हेंबर २०१६ साली धाडस करून नराधम बापा विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नराधमााला जन्मठेपेची शिक्षा: त्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचारासह पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यावेळी तत्कालीन पोलीस वरिष्ठ निरीक्षक आंधळे यांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन नराधम बापाला गुन्हा दाखल झाल्यापासून काही तासातच अटक केली. तर पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी तिला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात तपासणी करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपपत्र कल्याण न्यायालयात दाखल केले. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात ७ वर्षे या दाव्याची सुनावणी सुरू होती. त्यानंतर अंतिम सुनावणीवेळी न्या. अशतुरकर यांनी आरोपी बापाला मुलीबाबत केलेला अत्याचाराचा प्रकार हा घृणास्पद आहे. शिवाय नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत त्यांने ही शिक्षा भोगायची आहे, असा निर्णय दिला.
वकील आणि पोलिसांच्या प्रयत्नाना यश: दोषी बापाने दंडाची २० हजार रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करून ती पीडित मुलीच्या साहाय्यासाठी देण्यात यावी. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मनोधैर्य किंवा इतर योजनेतून मुलीला काही साहाय्य मिळते का, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना न्यायालयाने दिले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. कदम्बिनी खंडागळे यांनी मुलीच्यावतीने प्रखर बाजू मांडली. तर कल्याण पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.