ठाणे - शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याला लागून असलेल्या बेलवड गाव परिसरातील माढेपाडा येथे गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून कोंबड्या, कुत्रे, यांच्यानंतर या बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांकडे आपला मोर्चा वळवला असून माढेपाडा येथील आदिवासी शेतकरी किसन माढे यांची गोठ्यातील गाय या बिबट्याने हल्ला करून फस्त केली आहे. याबाबत खर्डी वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा - VIDEO : रस्त्यावर अचानक आला बिबट्या; सेल्फी काढण्यास गेलेल्या व्यक्तीसोबत काय केले पाहा..
बिबट्याचा माग घेण्यासाठी सी.सी.टीव्ही. कॅमेऱ्यांचा आधार
शहापूर तालुक्यातील यापूर्वीही टेंभा,रोजपाडा, उंबरपाडा, या गाव पाड्यांमध्ये बिबट्याने कोंबडी, कुत्रे, यांचा फडशा पाडला होता. यावेळी वनविभागाने बिबट्याचा माग घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मात्र, अद्यापही बिबट्याला पकडण्यास वनविभागाला अपयश आले आहे. आता मात्र पाळीव जनावरांकडे बिबट्याने आपले भक्ष्य बनविण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तानसा अभयारण्यातून बिबटे शिकारीच्या शोधात गावात
शहापूर तालुक्यातील घनदाट असलेल्या तानसा अभयारण्यातून बिबटे शिकारीच्या शोधात गावाकडे येत आहेत का, याचा देखील योग्य तपास वनअधिकाऱ्यांनी करून बेलवड व माढेपाडा परिसरात ही सीसीटीव्ही कॅमेरे लावून रात्रीची गस्त वाढवावी व परिसरात दवंडी देऊन रात्री नागरिकांनी घराबाहेर पडू नये, याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक कृष्णा माढे यांनी वनविभागाकडे केली आहे.
हेही वाचा - नाशिकच्या पिंपळद गावात बिबट्याचा धुमाकूळ; श्वानावर केला हल्ला