नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन पाहणी व मदतीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आजपासून कोकण दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात भाजपचे आमदारही सहभागी होणार असून, सकाळी पनवेलपासून दौऱ्याला प्रारंभ झाला आहे.
कोकणामधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या दोऱ्यात घेण्यात येणार आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करुन त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार यांनी आजपासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील व आमदार महेश बालदी या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत. कोकणच्या दौऱ्याची सुरुवात रायगड जिल्ह्यापासून होणार आहे. पनवेल येथील एमजीएम रुग्णालय येथून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे.