ठाणे - लेडीज बारमध्ये महिला वेटर म्हणून काम करण्याच्या वादातून प्रियकराने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमधील शास्त्रीनगर एटीपी हायस्कूलजवळ घडली आहे.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रियकरावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. जॉनी थामस असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित महिला उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ३ येथील शांतीनगर परिसरात राहते. ती लेडीज बारमध्ये महिला वेटर म्हणून कामाला जात असल्याने तिचा प्रियकर जॉनी याला ते पसंत नव्हते. त्या कारणावरून तो तिला वारंवार त्रास देत होता. तो त्रास देत असल्याने संगीताने जॉनीच्या घरी जाऊन त्याच्या आई व भावाकडे जॉन हा आपल्याला वारंवार त्रास देतो अशी तक्रार केली. यामुळे चिडलेल्या जॉनने गुरुवरी रात्री अकराच्या सुमाराला शास्त्रीनगर एटीपी हायस्कूल जवळ संगीताला रस्त्यात अडवले व तिच्यावर धारदार चाकूने पोटावर, छातीवर, कमरेवर व मागील बाजूस डाव्या हाताच्या बोटावर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगीताला उपचारासाठी उल्हासनगरमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हल्लेखोर जॉनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.