ठाणे - 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवारी (२६ डिसेंबर) होणार आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील काही भागातून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खग्रास स्थितीत दिसणार आहे. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या विषयी माहिती दिली.
महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्य चंद्रबिंबामुळे झाकलेला दिसणार आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरुवात होणार आहे. सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी ग्रहणमध्ये होईल. १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.
हेही वाचा - मुंबईतील गोएथिक चित्रशैलीने सजलेल्या कुलाब्यातील 'वुडहाऊस चर्च'ची गोष्ट
सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्याला झाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्य आणि पृथ्वीच्या समोर आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसत राहते. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. यालाच 'फायर रिंग' असेही म्हणतात. गुरुवारी सूर्याची अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोईम्बतूर, धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड, कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, तिरूचीपल्ली, तिरूर इत्यादी ठिकाणांहून सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसणार आहे.
चंद्रग्रहण सर्व ठिकाणांहून एकाच वेळी सारखे दिसते. सूर्यग्रहण दिसण्याच्या वेळा स्थानपरत्वे थोड्या प्रमाणात बदलत असतात. यानंतर २१ जून २०२० ला होणाऱया सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसेल. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातून हे सूर्यग्रहण दिसेल.