ठाणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसह सभा मिरवणुकांवर बंदी घातली आहे. त्यातच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारच्या सुमारास पार पडल्यानंतर नवनिर्वाचित झेडपी अध्यक्षांच्या गावात मोठी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. एकीकडे कोरोना नियमांचे पालन करण्याचे जिल्हा परिषदेकडून आवाहन केले जात असताना अध्यक्षांच्या गावात मात्र कोरोना नियमांना पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे.
रस्त्यावर वावरताना मास्क परिधान केले नसल्यास दंड वसूल करून त्यांना पोलीस आपला रंग दाखवतात. मात्र सत्ताधारी शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या पुष्पा बोराडे - पाटील यांच्या गावातच कोरोना नियमांना बाजूला सारत मोठी विजयी रॅली काढली असल्याचे समोर आले आहे. बदलापूरच्या आस्नोली गावातील हा व्हिडिओ असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र एकीकडे कोरोनाचा कहर तर दुरीकडे लोकप्रतिनिधींनी कहर केला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना नियम हे सर्वसामान्य नागरिकांसाठीच उरले आहेत का ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.