ठाणे - कोपरी कॉलनी येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले. सकाळीच हा घृणास्पद प्रकार पाहायला मिळाल्याने नागरिक प्रचंड संतापले आहेत. दरम्यान यापूर्वीही असा प्रकार येथे घडल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
ठाणे पूर्व कोपरी येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीत ठाणे पूर्व सोबतच आनंदनगर आणि मेंटल हॉस्पिटलपर्यंतचे नागरिक अंतिम संस्कारासाठी मृतदेह आणतात. बुधवारी सकाळी येथील नागरिकांना अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या भलामोठ्या तुकड्याचे कुत्र्यांनी लचके तोडले. ही घटना काही नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले. त्यानंतर ही घटना स्मशानभूमीचा कारभार पाहण्याऱ्या धर्मदाय संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून धर्मदाय ट्रस्ट या स्मशानभूमीचा कारभार पहात आहे. आधुनिकीकरणाच्या नावावर येथे मोठे अनधिकृत काम देखील करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे यापूर्वी येथे नागरिकांनी आंदोलनेही केली आहेत. ट्रस्टने नेमलेला सुरक्षा रक्षक रात्री मद्यधुंद अवस्थेत असतो. त्यामुळे येथे मृतदेहाची विटंबना होत असल्याचा प्रकार घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आपल्या आप्तेष्टांच्या मृतदेहांची होत असलेली ही विटंबना पाहून नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. संबंधितांवर त्वरित कडक कारवाई करावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.