नवी मुंबई - कोपरखैरणे येथे किरकोळ वादातून फिल्मीस्टाईलने गोळीबार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गजाआड केले. कोपरखैरणे जिमी टॉवर या ठिकाणी एक व्यक्ती गुरुवारी (दि. 18 मार्च) त्याची प्रवासी मोटार घेऊन उभा होता. त्या मोटारीला रुपेश कुरकेरा (वय 35 वर्षे) याने त्याच्या दुचाकीने धक्का दिला. याचा जाब संबधित व्यक्तीने रुपेश याला विचारला. त्यानंतर दोघांत भांडण सुरू झाले. राग अनावर झाल्याने रागाच्या भरात रुपेशने जवळ असलेली पिस्तूल संबधित व्यक्तीवर उगारली व जमिनीवर गोळीबार करून पळ काढला.
नातेवाईकाच्या हत्येसाठी घेतली होती पिस्तूल
रुपेश कुरकेरा हा कोपरखैरणे सेक्टर 2 येथे राहणारा आहे. घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत पिस्तूल घेऊन एका नातेवाईकाच्या हत्येच्या उद्देशाने चालला होता, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, अचानक झालेल्या भांडणाने त्याने चारचाकी मोटार चालकावर बंदूक उगारली व या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याच्या शोधासाठी 6 पथके तयार केली होती. अखेर त्याला अवघ्या 48 तासांत अटक करण्यात आली.
हेही वाचा - स्वतःसह तीन कुत्र्यांना व्यक्तीने पेटवले; ठाण्यातील धक्कादायक घटना
हेही वाचा - नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील खाजगी कंपनीला भीषण आग