ठाणे Konkan Railway : गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे भोग संपायचे कोणतेही चिन्ह सध्या दिसत नाही. रविवारी सकाळपासूनच चाकरमान्यांनी ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी केली होती. परंतु कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिर धावत असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी वडगावसाठी सुटणारी मांडवी एक्सप्रेस रद्द झाल्यानं गणेश भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला.
रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी : गौरी गणपती आले की कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली अशा विविध शहरातून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात रवाना होतात. या दरम्यान ते कोणत्याही परिस्थितीत, प्रसंगी मोठा खर्च करून आपलं गाव गाठण्यासाठी धडपड करत असतात. आज सकाळी देखील दादर, ठाणे आणि दिवा स्थानकावर कोकणात जाण्याऱ्या लोकांची प्रचंद गर्दी दिसून आली.
गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत : सध्या ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेची सेवा कोलमडल्यानं हजारो गणेशभक्त विविध स्थानकावर अडकून पडले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्यांचा वेग मंदावलाय. या मार्गावरील सर्व गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. नियमित गाड्यांनाही याचा फटका बसल्यानं प्रवाश्यांचे मोठे हाल होतं आहेत.
प्रवासी हतबल झाले : या गोंधळामुळं गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं जाणाऱ्या चाकरमान्यांच्या नशिबी प्लॅटफॉर्मवर तातकळत राहण्याची वेळ आली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असून, याबाबत कोणती पूर्वसूचना दिली नसल्यानं प्रवासी हतबल झाले आहेत. शनिवार रात्रीपासून ठाण्याहून तुडुंब गर्दीनं भरलेल्या गाड्या कोकणात रवाना होणं सुरू झालं. यामुळे वरिष्ठ नागरिक, स्त्रिया आणि मुलांना प्रचंड त्रास भोगावा लागतोय.
बसेसची व्यवस्था : कोकण रेल्वेची गर्दी पाहून आता जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. यामुळे कोकणवासींना थोडाफार दिलासा मिळतोय. मात्र मागच्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा विषय मात्र या गणेशोत्सवाच्या निमित्तानं थोडासा मागं पडल्याचं चित्र आहे.
हेही वाचा :