नवी मुंबई - खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात खळबळ माजली आहे.
खारघर पोलीस ठाण्यात होते कार्यरत
खारघर पोलीस स्टेशनला नेमणूक असलेले पोलीस हवालदार संतोष नामदेव पाटील (वय 47) हे सरस्वती काॅऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, नवीन पनवेल येथे राहत होते. त्यांनी सोमवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान गळफास लावून घेतला. त्या वेळी त्यांच्या पत्नीसह दोन मुली घरात होत्या. बराच वेळ दरवाजा ठोठावून आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा संतोष पाटील यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच सोसायटीमध्ये राहणारे वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत सतीश पवार यांनी त्यांना तेरणा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आजारपणाला कंटाळून केली आत्महत्या
संतोष नामदेव पाटील हे काही दिवसापासून आजारी असल्याने रजेवर होते.आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना समजताच खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे घटनास्थळी पोहचले. पाटील यांचा अंतिम विधी त्याच्या मुळगावी पाचोरा येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.