ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कोरोनाबाधिताचा चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे केडीएमटीच्या कामगार वर्गात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
केडीएमटीचे स्थायीचालक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयातील रूग्णवाहिकेवरील एका कोरोनाबाधित वाहनचालकाचे 24 मे ला निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स या केंद्र सरकारच्या पॅकेज अंतर्गत 50 लाख आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कामगार कल्याण निधीतून 25 लक्ष असे एकूण 75 लाख रुपये, तसेच त्यांच्या पात्र वारसाला अनुकंपा तत्वावर शासन निर्णयाप्रमाणे नोकरी देण्याबाबत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जाहीर केले आहे.
मुंबईतील बेस्टनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असाच निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या चालकाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत तसा निर्णय घ्यावा, अशी मागणी केडीएमटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काय निर्णय घेतात? याकडे केडीएमटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू