ठाणे - कोरोना काळात उत्पन्न वसुलीत घट झाली. मात्र कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देणार असल्याची घोषणा दोन्ही महापालिकांच्या महापौरांनी केली आहे. त्यामुळे कोरोना काळात काम करणाऱ्या या कर्माचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मात्र उल्हासनगर महापालिका कर्मचारी दिवाळी बोनस जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
15 हजार सानुग्रह अनुदान जाहीर -
गतवर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 14 हजार सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी 1 हजार रुपये वाढवून 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी मंगळवारी सायंकाळी पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत जाहीर केले. या सानुग्रह अनुदानाचा फायदा महापालिकेतील व परिवहन विभागातील सुमारे 6 हजार 376 स्थायी,अस्थायी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाची दिवाळी आनंदात जाणार आहे. कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत करून खूप चांगले काम केले आहे, अशा शब्दात कर्मचाऱ्यांची प्रशंसा त्यांनी केली.
भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मागील वर्षी 8 हजार 100 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी 16 हजार रुपयांची घोषणा करण्याची मागणी कर्मचारी महासंघाकडून करण्यात आली. परंतु सध्या कोरोना काळात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना मागील वर्षीच्या रक्कमेत समाधानकारक वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. अशी माहिती लेबर फ्रंट कामगार संघटनेचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी दिली. प्रशासनाने 9 हजार रुपयांचे जाहीर केलेले अनुदान कमी असले तरी कोरोना काळात समाधान मानत असल्याची प्रतिक्रिया संतोष चव्हाण यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची 20 हजार रुपये बोनसची मागणी -
उल्हासनगर महापालिका आयुक्त व विविध कामगार संघटनांच्या नेत्यांची दिवाळी बोनसबाबत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये बोनस देण्याची मागणी कामगार नेत्यांनी केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून निर्णय झाला. पालिकेतील 2 हजार 200 कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. मागच्यावर्षी 15 हजार रुपये दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोनाच्या काळात दिवस रात्र काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 20 हजार दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी मागणी नेत्यांनी केली आहे. आता बोनसच्या संदर्भात 4 नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती नुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.