नवी मुंबई - संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांनी पोलिसांवरच हल्ला करीत महिला पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी एका महिलेला व तिच्या पतीला कामोठे पोलिसांनी गजाआड केले आहे.
कोरोना प्रसाराला आळा बसून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. मात्र काही लोक विनाकारण फिरताना पोलिसांना आढळून येत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. कामोठे परिसरात अशाच एका कारवाईत काही मुली आढळून आल्या. त्या अत्यावश्यक सेवेतीलही नव्हत्या. तसेच त्या विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांना कामोठे पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. नाव नोंदणी आणि दंड वसुली करून समुपदेशन करीत योग्य ती कारवाई करण्यात येणार होती.
कारवाईत पकडून आणलेले नागरिक पळून जाऊ नये. म्हणून कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर महिला पोलीस कर्मचारी तैनात होत्या. ही कारवाई सुरू असताना सुरेखा ढालवणे ही महिला व अलिशाह ढालवणे हा पुरुष कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात येत आमच्याच मुलींना का पकडले, इतर लोक बाहेर हिंडत नाहीत का? म्हणून अर्वाच्य शिवीगाळ करीत होते. त्यांना समज देण्याचा प्रयत्न करीत असताना एका महिला पोलिसाचा हात सुरेखा हिने पिरगाळला तर अन्य पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण केली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.