ठाणे - पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक रस्त्यांची घाईघाईने डागडुजी करून रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका पावसापुढे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. खड्ड्यांची अवस्था जैसे थे पहायला मिळत आहे. ठेकेदार आणि पालिका प्रशासनाला नागरिक या सर्व प्रकाराला जबाबदार धरत आहेत.
दरवर्षी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे, रस्त्यांची डागडुजी करणे, डांबरीकरण करणे, रस्ता दुरुस्तीच्या दृष्टीने उपाययोजना करणे, तसेच पावसाळ्यानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे भरणे या कामांसाठी महापालिकेच्या अंदाज पत्रकात भरीव, अशी आर्थिक तरतूद केली जाते. गेल्या वर्षी या कामासाठी तब्बल ६ कोटी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी खड्डे भरण्यासाठी तब्बल १५ कोटी आणि रस्त्यावरील डागडुजीसाठी २१ अशी एकूण ३६ कोटी एवढी मोठी आर्थिक तरतूद केल्याने कामे उत्कृष्ट दर्जाची होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक आचारसंहिता मे महिन्यापर्यंत लागू असल्याने पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते डागडुजीची आणि खड्डे भरण्याची कामे घाईघाईने उरकण्यात आले होते. रस्त्यावर पडलेले खड्डे खोदून ते शास्त्रशुद्ध पद्धतीने भरणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदार करत असलेले रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने केली जात आहे की नाही? यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याचे समजते. यंदा पावसाने ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांचे सलग दुसर्या वर्षीही खड्डे भरण्याच्या व रस्ते दुरुस्तीच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळा सुरू होऊन अवघ्या आठ ते पंधरा दिवसातच पावसाने रस्ते उखडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी नेमके काय करून दाखवले? असा सवाल कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना पडला आहे.