ठाणे- अश्लील नृत्य सुरू असलेल्या डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील सेव्हन स्टार बारमध्ये कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास छापेमारी केली. या कारवाईत पोलिासांनी १७ बारबालांसह बारमध्ये अय्याशी करणारे १५ ग्राहक, १५ वेटर आणि ९ गायकासह वादकांना ताब्यात घेतले आहे.
अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच -
कल्याण गुन्हे शाखेने डोंबिवली पूर्वीतील मानपाडा रोडवर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेव्हन स्टार ऑर्केटा बारमध्ये काल रात्रीच्या सुमारास अचानक छापेमारी केली. त्यावेळी एका हिंदी गाण्यावर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच सुरु होता. या छापेमारीत पोलिसांनी १७ बालबालांसह इतरांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल १७ बारबाला बारचालकाने ठेवल्या होत्या.
नियम पायदळी तुडवत बार सुरू -
सेव्हन स्टार बारमध्ये बारचे चालक-मालक, कर्मचारी व ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास प्रोत्साहित केल्याप्रकरणी तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने कल्याण डोंबिवली शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास बारबालांना नाचवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे मानपाडा रोडवरच डझनभर ऑर्केस्ट्रा बार असून या सर्वच बारमध्ये शासनाचे नियम पायदळी तुडवत हे बार सुरू आहे.
हेही वाचा - प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी गेलेल्या प्रियकराचाच आगीत भाजून मृत्यू