ठाणे - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंद पुकारण्यात आला आहे. भारत बंदमध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीनेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
शेकडो भाज्या व फळांचे ट्रक बाजार समितीत दाखल होणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला बहुतांश विरोधी पक्षांबरोबरच देशातील नामांकित व्यक्तींचाही पाठींबा मिळत आहे. राज्यामध्ये मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तर कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनेही या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कृषी बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी सांगितले.
कल्याण एपीएमसी मार्केटमधील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघही बंदमध्ये सहभागी होणार असल्याने मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे शेकडो भाज्या व फळांचे ट्रक बाजारात दाखल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरात पोलीस बंदोबस्त -
कोकण विकास महासंघ, टॅक्सी रिक्षा महासंघ, किसान सभा, संभाजी ब्रिग्रेड, मराठा क्रांती मोर्चा, लाल बावटा रिक्षा युनियन अशा अनेक संघटनांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शिवला आहे. त्यामुळे उद्या बंदचा परिणाम जिल्ह्यात जाणवणार असून यासाठी आज सायंकाळपासूनच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्याच येत आहे.