ठाणे- कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आव्हाडांना शह देण्यासाठी शिवसेना गोटातून अनेक खलबते सुरू आहेत. त्यातच गुरुवारी रात्री उशिरा शिवबंधन बांधलेल्या मराठी सिनेसृष्टी अभिनेत्री दीपाली सैयद यांना अखेर या विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी मात्र 'बाबुल की दुवाए लेती जा, जा तुझ को सुखी संसार मिले' हे गाणं गात त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.
हेही वाचा- राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
'राष्ट्रवादीमधून सर्वच निघून गेले असून एकटे राहिलेल्या आव्हाडांनाच आता बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे,' असं सांगत त्यांनी आव्हाडांना प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे या विधानसभेची निवडणूक आता अधिक रंगतदार होणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अनोखी खेळी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कोण? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आता विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी दीपाली सैयद यांच्या माध्यमातून मुस्लिम उमेदवारीच शिवसेनेकडून उतरवण्यात आला आहे. दीपाली सैय्यद यांचे वडील कळव्यातील मुकूंद कंपनीमध्ये कामाला होते. त्यामुळे त्या या विधानसभा क्षेत्रात राहत होत्या, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना या विधानसभा क्षेत्रातून उतरवण्यात आले आहे.
हेही वाचा- भाजपकडून खडसेंना डच्चू... खडसेंना उमेदवारी
कळवा-मुंब्रा विधानसभा मततदार संघात शिवसेना उमेदवार कोण? याबाबत गुरुवारपर्यंत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवावी, असा पक्षाचा आग्रह होता. मात्र, भोईर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या समोर कोणता तुल्यबळ उमेदवार द्यायचा याबाबत शिवसेनेकडून चाचपणी सुरू होती. दीपाली सैय्यद यांचे मराठी सिने जगतात नाव असून त्या मुस्लिम असल्याने बराच फरक या मतदारसंघात पडू शकतो. दुसरीकडे ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र सापते, माजी नगरसेवक सुधीर भगत, तसेच एकनाथ शिंदे यांचे समर्थक रविकांत पाटील यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, अभिनेत्री दीपाली सैय्यद यांनी अखेर अर्ज भरला असल्याने नागरिक विकासाला मत देणार की कलेचा सन्मान करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.