ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरील वेटिंग रूममधून एका चार वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात ( Child abduction from railway waiting room ) आले होते. मात्र, रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून आरोपीला आठ तास बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका पोलिसांनी केली आहे. अपहरणकर्त्याला चार मुली असल्याने मुलाचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. कचरू वाघमारे असे अटक आरोपीचे नाव आहे. अथर्व असे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका : कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केलेल्या बालकाचे वडील करण गुप्ता, त्यांची पत्नी शुभांगी हे दोन वर्षाची मुलगी कीर्ती आणि चार वर्षाचा मुलगा अर्थवसह कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहून दोघेही पती पत्नी मजुरीचे काम करतात. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास कपडे धुण्यासाठी ते कल्याण रेल्वे स्टेशन वरील वेटिंग रूममध्ये आले होते. मात्र कपडे धुण्यासाठी साबण संपल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर खेळताना सोडून आई, वडील साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली वेटिंग रूममध्ये खेळत होत्या. तसेच वेटिंग रूममध्ये एक जोडपेही बसले होते. या जोडपल्या आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून वडील करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेले होते.
आरोपीला अटक : काही वेळानंतर साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना अथर्वसह खेळत असलेले चारही मुली तिथे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वडील करण यांनी रेल्वे स्थानकात आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा आढळून आला नाही. अखेर त्यांनी कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख तत्काळ बालकाचा शोध सुरू करून स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासून बालकाच्या शोधासाठी पथके नेमली. त्यानंतर सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा व्यक्ती अर्थवला घेऊन नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत असतानाच, पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून पकडले.
आरोपीला पोलीस कोठडी : पोलिसांनी आरोपी कचरू वाघमारे याच्या तावडीतून बालकाची सुखरूप सुटका करून आईवडिलांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे आरोपी कचरू हा नाशिक शहरातील जेल रोड परिसरात राहणारा असून त्याला चार मुली आहेत. मात्र त्याला मुलगा हवा होता. त्यामुळे मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षाच्या अथर्वचे अपहरण केल्याचे समोर आल्याने पोलीसही चक्रावले आहेत. आरोपी कचरूवर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करून तो गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आज कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला रेल्वे न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा -