ठाणे - राज्यात पत्रकारांवरील वाढते हल्ले व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच भिवंडीतील एका पत्रकाराच्या घरासमोर पार्क करून ठेवलेली स्विफ्ट कारची अज्ञात इसमाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.
नितीन पंडित असे पत्रकाराचे नाव असून ते भिवंडी शहर व तालुका प्रतिनिधी म्हणून दैनिक लोकमतमध्ये कार्यरत आहेत. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार नितिन पंडीत तालुक्यातील वडघर,पंचशीलनगर या गावात राहतात. त्यांच्या राहत्या घराच्या बाजूला त्यांनी आपली स्विफ्ट कार पार्क करून ठेवली होती. मात्र, बुधवारी पहाटे अज्ञात इसमांनी या गाडीची पाठीमागील काच पेव्हर ब्लॉक लादीच्या सहाय्याने फोडून गाडीचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे. चार वर्षांनंतर पुन्हा अशा प्रकारे वाहन नुकसानीची घटना घडल्यामुळे पत्रकार नितिन पंडीत यांची व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पत्रकारांच्या केली आहे.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी ३० जानेवारी २०१६ रोजी देखील पत्रकार नितिन पंडीत यांची दुचाकी जाळल्याची घटना घडली होती. वाहन नुकसानीच्या वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे येथील पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा भिवंडी शहर व ग्रामीण पत्रकारांनी निषेध करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तर या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिले आहे.