ठाणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'रिपब्लिकन' हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. त्यामुळेच वंचित आघाडी उघडून रिपाइंचे राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे उपस्थित होते. आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली असली तरी त्यात रिपाइला कुठेच स्थान नसल्याचे त्यांनी सांगितले. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइंचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता, असाही आरोप कवाडे यांनी यावेळी केला.
तर आम्ही स्वबळावर राज्यात 51 जागा लढवू-
एकूणच भाजपची मंडळीच या वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपांची चर्चा झाली आहे. मात्र आमचा सन्मान केला गेला नाही, तर आम्ही स्वबळावर राज्यात 51 जागा लढवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यात कोल्हापुर, सांगली आदींसह इतर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना दुसरीकडे भाजपचे नेतेमंडळी शासकीय मदतीच्या पाकिटांवर आपले स्टीकर लावून प्रचार करताना दिसत आहे. शिवाय या परिस्थितीत मुख्यमंत्रीही जनादेश यात्रेत मश्गुल असल्याचा टोला त्यांनी लगावला. आता ही यात्रा बंद असली तरी ती पुन्हा सुरु होणार आहे. देशाचे गृहमंत्री पुरग्रस्त भागांचा हेलीकॉप्टरद्वारे पाहणी दौरा करुन गेले. परंतु त्यांच्या सोबत मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांना येथील नेमकी परिस्थिती समजणार कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पूरस्थितीतही भाजपचे नेते सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. एकुणच या भाजपवाल्यांना सत्तेचा माज आला असून त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान आता विविध रिपब्लीकन विचारसरणींना एकत्र घेऊन रिपाइं जनशक्ती महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. त्याचा मेळावा 26 ऑगस्ट नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये विविध रिपाइंच्या संघटनांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.