ठाणे - कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, तरीही नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंब्रा-कळवा परिसरातील नागरिकांना जितेंद्र आव्हाड यांनी धमकीवजा इशाराच दिला आहे. 'विनाकारण घरातून बाहेर पडाल, तर 14 दिवसांसाठी जेलमध्ये टाकू', असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातील एका मशिदीतून 13 बांगलादेशी आणि 2 आसामी संशयित कोरोनाबाधितांना विलगीकरणासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ही केवळ अफवा आहे, असे वक्तव्य करून खुद्द पोलीस उपायुक्तांना जितेंद्र आव्हाडांनी खोटे ठरवले होते. मुंब्रा- कळव्यातील नागरिक सर्रासपणे लॉकडाऊनचे आदेश धुडकावत आहेत. पोलीस राजकीय दबावाखाली कारवाई करतील की, नाही असे चित्र दिसत येथे दिसत होते.
मात्र, आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आव्हाड पोलिसांना घेवून रस्त्यावर उतरले आहेत. कळवा भागातील जानकीनगर परिसर संपूर्णतः सील केल्याची घोषणा त्यांनी स्वतः जाऊन केली. विनाकारण घरातून बाहेर पडाल तर 14 दिवसांसाठी जेल मध्ये टाकू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी येथील नागरिकांना दिला आहे. तुम्हाला स्वतःची काळजी नसेल मात्र, मला तुम्हा सर्वांची काळजी आहे. त्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे ते मोठ्या पोटतिडकीने सांगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.