ठाणे - आंतरराष्ट्रीय परिस्थिती खराब असल्यामुळे 2011 -12 साली पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्वीटद्वारे सरकारवर जोरदार टीका केली होती. आता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार दिसतच नाहीत? ते गेले कुठे? असा प्रश्न गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. यातून एक प्रश्न निर्माण होतो की, त्यांना मोदींचा प्रचार करण्यासाठी मोकळे सोडले होते काय? का ते भाजपeचे कार्यकर्ते होते, असा खोचक टोलाही आव्हाड यांनी लगावला.
मनमोहनसिंग यांचे सरकार असताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की, आता तर गाड्या जाळाव्या लागतील आणि अक्षय कुमारने लिहिले होते, आता तर सायकल चालवावी लागेल. पण, आताच्या किमती ऐतिहासिक आहेत. आता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार दिसतच नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
व्यक्ती स्वतंत्र्याबाबत मोठ्या गप्पा मारणारे अमिताभ बच्चन आता कुठे आहेत? त्यांनी आपली भूमिका बदलली का? का त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? इतके शांत का?, असे सांगत आव्हाडांनी, असे प्रश्न विचारले जाणारच, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. माणसांनी आता आपण नि:पक्षपाती आहोत, असे बोलून चालत नाही; तर ते सिद्ध करावे लागते आणि ते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना करावे लागेल, असे देखील आव्हाड यांनी म्हटले आहे.