ठाणे- कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याअनुषंगाने कल्याणातील झुंजारराव धान्य मार्केट परिसरात घाऊक धान्य खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने 14 जूनला रात्री 12 वाजतापासून सदर मार्केट धान्य विक्रीसाठी कृषी उपन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
महापालिकेने मनपा क्षेत्रातील दुकाने व आस्थापना आळीपाळीने सुरू करण्याबाबत यापूर्वीच आदेश निर्गमित केले असून सदर आदेशाच्या अनुषंगाने झुंजारराव धान्य मार्केटमधून स्थलांतरित करण्यात आलेल्या घाऊक व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवसाय कृषी उत्पन्न समितीच्या आवारातच करावयाचे असून किरकोळ विक्री व्यवसायासाठी झुंजारराव मार्केटमधील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी आळीपाळीने दुकाने सुरू करण्यासाठी सम विषम तारखा ठरविण्याबाबत व सोशल डिस्टन्सिंग पालन करणे, सॅनिटायझर, मास्क इत्यादी वापराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्याबाबतचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
तथापि, सदर ठिकाणी गर्दी होत असल्याचे निर्दशनास आल्यास वा तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याबाबत आढळल्यास अथवा तेथील किरकोळ विक्रीची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधी व्यतिरिक्त सुरू असल्याचे दिसून आल्यास दुकाने बंद करण्याबाबत उचित कार्यवाही करावी, असेही सदर आदेशात नमुद करण्यात आले आहे.