ठाणे - 'देश स्वतंत्र होऊन 73 वर्ष लोटली, भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र शहिदांचा पाहिजे तसा सन्मान झाला नाही, हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे', अशी असल्याची खंत शहीद भगतसिंग यांचे पणतू विक्रमसिंग संधू यांनी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढत असलेले विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलताना होते.
कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अपक्ष उमेदवार पवार यांचे निवडणूक प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शहीद भगतसिंग यांचे पणतू विक्रम सिंग संधू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार पवार हे अपक्ष उभे असल्याने स्टार प्रचारक म्हणून विक्रम सिंग संधू यांना आमंत्रित करण्यात आले होते. पवार यांच्या कामाने प्रभावित होऊन पहिल्यांदाच परिवारातील कुणीतरी उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचेही संधू यांनी याेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - मनसेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची माघार; मुंब्र्यातही एमआयएमच्या उमेदवाराचे घुमजाव
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार भाजपकडून लढले हाते. मात्र, यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यामुळे बंडखोरी करत पवार आता शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्याविरूद्ध अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.