नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसची निर्यात ठप्प झाली होती. मात्र, रमाझनच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात मात्र हापूस आंब्याला मागणी वाढली आहे. 20 तारखेपासून मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील फळ मार्केट सुरू झाले आहे. सद्यस्थितीत कोकणातील हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. एपीएमसीमधील फळ मार्केटमध्ये तब्बल 25 ते 30 हजार पेट्यांची आवक दररोज होत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक 100 टक्क्यांनी कमी असून माल कमी असल्याने आंब्यांचे बाजारभाव वाढलेले आहेत.
सद्यस्थितीत एक पेटी आंब्यांचे बाजारभाव कमीत कमी 1 हजार रुपये व जास्तीत जास्त अडीच हजार रुपये इतका आहे, एका पेटीत पाच डझन आंबे आहेत. सध्या एपीएमसीमधील फळ बाजारात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हापूस आंब्यांची आवक बाजारात होत असून 25 ते 26 एप्रिलनंतर ही आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती फळ व्यापारी व फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंब्यांची निर्यात जरी कमी असली तरी दररोज येणाऱ्या पेट्यांपैकी 10 ते 12 हजार पेट्या समुद्र वाहतुकीच्या मार्गाने व हवाई मार्गाने आखाती देशात जात आहेत. मात्र, युरोप अमेरिका या ठिकाणी जात नाही. स्थानिक मार्केटमध्ये व रमझानच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात हापूस आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.