ठाणे - पिकअप टेम्पोतच सोलापूरवरून इतर शहरात विक्रीसाठी जाणारे साडे चार लाख रुपयांचे गोमांस कोनगाव पोलिसांनी जप्त करून चालकासह दोघांना अटक केली आहे. मंजूर गफूर मुल्ला (वय ३३, रा. शनिवार पेठ, सोलापूर) सैफन गफूर शेख (वय २२, रा. मल्लिकाजुर्ननगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे मार्च २०१५ पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई याभागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह परराज्यात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.
सोलापूरवरून केली जात होती मांसाची वाहतूक
भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथील पुलावरून उतरणाऱ्या मार्गावर कोनगाव पोलिसांनी रात्रीच्या सुमारास नाकाबंदी केली होती. यावेळी एका टेम्पोत (एम. एच. १२-एल. टी. ४४५२) यामध्ये गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन तपासणी करीत असतानाच टेम्पोच्या आतमध्ये पोलिसांनी पाहणी केली असता, जनावराचे मास असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांना घटनस्थळी बोलवून मांसाच्या तुकड्याची तपासणी केली असता गोवंश जनावराची कत्तल केलेले मांस असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर पोलिसांनी बेकायदा जनावरांचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी चालकासह त्याच्या साथीदारावर कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी दिली आहे.
१६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
गोवंश मांसाची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो ज्याची किंमत १२ लाख आणि टेम्पोतील ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे गोमांस असा एकूण १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने गाय तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गोवंश मांसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची बाब भिवंडीत वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची तरदूत करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून केली जात आहे.