ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका ( Kalyan Dombivli Municipality ) क्षेत्रात २ खासदार आणि ४ आमदार आहेत. परंतु शिंदे गटातील १ आमदार आणि १ खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) सह खासदार पुत्रावर निशाणा साधला. ठाणे जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होती. त्यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी हा संताप केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासमोर व्यक्त केला आहे.
स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी योजनेत कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या योजनेतील विकास काम हि शिंदे गटातील एक आमदार एक खासदार असलेल्या मतदारसंघात सुरु असल्याचे दिसून आले आहे. सध्या कल्याण डोंबिवली परिसरात स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग आला आहे. मात्र अन्य ३ आमदारांच्या मतदारसंघांना वगळून एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू असल्याने मनसे आमदार राजू पाटील, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
आमदारांनी नाराजी व्यक्त केली : डोंबिवली रेल्वे स्थानकाला सॅटीस स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. फक्त ठराविक मतदारसंघांकडे लक्ष देऊन अन्य विधानसभा क्षेत्रांकडे सुर्लक्ष होत असल्याने बैठकीला उपस्थित मनसे - भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमृत योजनेच्या कामाचा ऑडिट होणार : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या ठेकेदाराची जबाबदारी आहे, कि रस्त्याची दुरुस्ती करून देणं अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच संबंधीत ठेकेदाराच्या कामाचा देखील ऑडिट करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी बैठकीत केली आहे. त्यानुसार या कामाचा लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केल जाणार असल्याची माहिती केडीएमसी कडून देण्यात आली आहे. स्थानिक आमदारांना घेऊन सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामाचा दौरा करण्याच्या सूचना देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या आहेत.
लोकग्राम ब्रिजचे काम धीम्या गतीने : कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम ब्रिजचे काम हे धीम्या गतीने सुरु आहे. या पुलाची उभारणी हि रेल्वे कडून करण्यात येणार असून त्या संबंधीतीले रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात रेल्वेकडे पाठपुरावा केला जात नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नंतर तातडीने या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिका पाठपुरावा करेल असं आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे. केडीएमसी, एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम संथ गतीने सुरु आहे.
दिव्याकडे लक्ष द्यायला हवे - केंद्रीय मंत्री कपिल पाटील : सोमवारी झालेल्या दिशा बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील समस्यांचा पाढा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने दिवा डम्पिंग, भंडार्ली डम्पिंग,स्वच्छता गृह, वाहतूक कोंडी, अर्धवट पूल आधी समस्यांचा पाढा वाचला. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून दिव्याकडे लक्ष द्यायला हवे असे सूचित देखील ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांना करून दिले आहे.