नवी मुंबई - नवी मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर यापुढे असणार आहे. कारण दोन अत्याधुनिक इंटर सेफ्टर वाहने नवी मुंबईतील वाहतूक विभागात दाखल झाली आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे उद्घाटन करण्यात आले आहे. संबंधीत वाहनातील अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने 200 मीटर अंतरावरील वाहनांवर करडी नजर ठेवता येणार आहे.
वाहतूक नियमांची पायमल्ली करणे नेहमीचेच झाले आहे म्हणून दंडात्मक रकमेत वाढ करूनही वाहतूक नियम पायदळी तुडवले जात आहेत. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, मद्यपान करून वाहने चालविणे या नियमांचे नेहमी उल्लंघन होताना दिसते. या नियम तोडणाऱ्यांना शिस्तीचा बडगा दाखविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दोन इंटर सेफ्टर वाहने दाखल झाली आहेत. संबधीत वाहनांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. अत्याधुनिक स्पीड गन (गती मोजणारे यंत्र), ब्रिदींग मशिन (मद्यपान तपासणी यंत्र), टेंटोमिटर (वाहनाच्या काचेची पारदर्शकता मोजणारे यंत्र) या वाहनात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हे सर्व यंत्रणा ऑनलाईन काम करते, यामुळे वाहन मालकाला फोटोसह थेट ई-चालान घरपोच मिळतो.
या वाहनाचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. १८ नोव्हेंबरपासून ही वाहने वापरात आणून वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.