ठाणे - हवामानातील बदलामुळे व भक्ष शोधण्यासाठी विषारी - बिन विषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या गेल्या २० दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील शहाड परिसरातील एका घरातील गॅलरीत चटयाबट्ट्याच्या कवड्या जातीचा साप, तसेच बांधकाम सुरू असलेल्या एका साईटवर नागा सारखा साप दिसल्याने येथील मजुरांची पळापळ झाली होती. या दोन्ही सापांना सर्पमैत्रिणीने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
हेही वाचा - ठाणे : स्वदेशी बनावटीच्या मेट्रोची निर्मिती पूर्ण, 2 अ आणि ७ मार्गावर धावणार
भक्ष शोधण्यासाठी साप बिळाबाहेर
नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदलल्याने बिळातून विषारी, बिन विषारी साप भक्ष शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकाम ठिकाणी काल सकाळच्या सुमारास नागा सारखा दिसणारा साप या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना दिसल्याने काम बंद करून त्यांच्यात पळापळ झाली होती. त्यांनतर साईट सुपरवायझर यांनी याबाबत सर्पमित्र दत्ता बोंबे यांना माहिती दिली असता, सर्पमित्र दत्ता आणि सिद्दी गुप्ता ही सर्पमैत्रिण घटनास्थळी पोहोचून या नागिणीला पकडून पिशवीत बंद केल्याने मजुरांनी सुटकेचा निश्वास घेतला.
चट्याबट्ट्याचा साप घराच्या गॅलरीत
दुसऱ्या घटनेत शहाड परिसरात राहणाऱ्या शोभा मन्नाडे यांच्या घरातील गॅलरीत काल सायंकाळच्या सुमारास लांबलचक चटयाबट्ट्याचा साप शिरला होता. मन्नाडे यांच्या पत्नी गॅलरीत कामानिमित्य गेल्या असता त्यांना लांबलचक चटयाबट्ट्याचा साप आढळून आल्याने त्यांनी घराबाहेर पळ काढून पतीला घरात साप शिरल्याची माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र दत्ता बोबे, यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता आणि सर्पमैत्रिण सिद्दी गुप्ता दोघेही घटनास्थळी आले. सिद्दीने सापाला शिताफीने पकडले. साप साडेचार फूट लांबीचा असून कवड्या जातीचा होता.
घराच्या बाथरूममध्ये शिरला साप
तिसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील एका घरातील बाथरूममध्ये साप दडून बसला होता. साप बाथरूममध्ये शिरल्याची माहिती नरेश पाटील यांनी सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता आणि सर्पमैत्रिण सिद्दी यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. साप चार फूट लांबीचा असून धामण जातीचा आहे. साप पकडल्याचे पाहून पाटील कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला.
निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान
या तिन्ही सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेवून जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता आणि सर्पमैत्रिण सिद्दी यांनी दिली. विशेष म्हणजे, सर्पमैत्रिण सिद्दी गुप्ता ही गेल्या तीन महिन्यापासून विविध सापांना शिताफीने पडकण्याचे प्रशिक्षण जेष्ठ सर्पमित्र दत्ता यांच्याकडे घेत आहे. तिने नुकतीच पदवीचे शिक्षण पूर्ण करून निर्सग प्राण्यांसह सापांना जीवदान मिळावे म्हणून प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानववस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून, कुठेही मानववस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
हेही वाचा - पनवेल पालिका क्षेत्रात 11 जणांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट; उलटी, तापाची लक्षणे