ठाणे - गणेश चतुर्थीपासून मनोभावे पूजाअर्चा करून आज (मंगळवार) पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र कल्याण - डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या 90 फुट रोड कचोरे, खंबालपाडा परिसरातील भाविकांच्या बाप्पांना यंदा देखील रेल्वे रूळ ओलांडून विसर्जनाच्या ठिकणी जावे लागले. तर कुठली दुर्घटना घडू नये, म्हणून रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात आले होते.
रेल्वे रुळांवरील जीवघेणा प्रवास टाळण्याची मागणी
कल्याण पूर्व आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील गणेश विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही. शिवाय या भागात तलाव नसल्याने बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर जावे लागते. या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्या लगत रेल्वे रुळापलीकडे आहे. विशेष म्हणजे रेल्वे रुळांवरील हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी या परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवणे व पुश थ्रू बोगदा बनविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विसर्जना दिवशी या ठिकाणी रेल्वे पोलीस सुरक्षा बल, स्थानिक पोलीस, स्थानिक सागरदेवी सेवक मंडळच्या मदतीने गणेश भक्तांनी विसर्जन पार पाडले.
हेही वाचा - मुंबईत सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार बाप्पाचे विसर्जन