ठाणे - पूर्वद्रुतगती महामार्गावरील शेकडो वृक्षांची बेसुमार कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. नवीन कोपरी पुलासाठी महार्गावरील डेरेदार वृक्ष छाटल्याने हा रस्ता आता भकास बनला आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता वृक्षांची शास्त्रोक्त छाटणी करून ते वृक्ष पुनर्जिवीत करण्याच्या अटीवर संबंधित प्राधिकरणांना परवानगी दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुंबईची वेस ओलांडण्यासाठी सोईचा असल्याने बहुतांश वाहनचालक पुर्वद्रुतगती महामार्गाचा वापर करतात. दररोज येथून तब्बल हजारो वाहनांची ये जा सुरु असते. त्यामुळे पूर्वद्रुतगती मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी दोन्ही मार्गिकांच्या बाजूला असणाऱ्या शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड चालवावी लागणार आहे.
यासाठी एमएमआरडीएद्वारे ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकारण विभागाची परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात आले. अनेक डेरेदार वृक्षांची छाटणी केल्याने महामार्गावरील सावली हरपली असून, हिरवीगार वृक्षसंपदादेखील नष्ट होत असल्याबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी दर्शवली आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्वद्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका आहेत.
मात्र, कोपरी रेल्वे पुलावर दोन्ही दिशेकडे प्रत्येकी दोन मार्गिका आहेत. त्यामुळे अरुंद पुलावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असते. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवरही होतो. ही कोंडी फोडण्यासाठी कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आले आहे.