ठाणे : शहापूर तालुक्यातील सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात नावाजलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि विधायक क्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत उबाळे हे तालुक्यातील ठिकठिकाणच्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील श्री मलंग विभागातील ठाकरे गटातील शाखा प्रमुख अशोक म्हात्रेसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नेहमीच आवाज उठवला : गेल्या काही महिन्यांपासून भरत उबाळे हे राजकीय परिवर्तनाची भूमिका घेणार असल्याची जोरदार चर्चा शहापूर तालुक्यात सुरु होती. भरत उबाळे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची शहापूर तालुक्यातील ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात गेली ३० वर्षांपासून सक्रीय असलेल्या भरत उबाळे यांनी आर्थिक दुर्बळ घटकांचे, दलित, आदिवासी, शेतकरी,कष्टकऱ्यांचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले. तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीटंचाई, कुपोषण, अन्यायकारी भूसंपादनाच्या प्रश्नांविरोधी देखील त्यांनी नेहमीच आवाज उठवला. सर्व जाती, धर्माच्या घटकांना विकासाच्या दिशेने नेणारे नेतृत्व अशी देखील त्यांची ओळख आहे.
मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित : मागील वर्षीच त्यांनी विधायक क्रांती सामाजिक संघटनेची स्थापना करुन, सर्व स्तरातील घटकांसाठी सामाजिक काम उभे केले होते. त्यास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक व्यापकतेने आणि बळकटीने काम करता यावे, म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सोबत करीत असल्याचे भरत उबाळे यांनी आजच्या पक्षप्रवेशाप्रसंगी बोलतांना सांगितले. यावेळी शहापूर तालुक्यातील दहागांव, कातबाव, अघई, सावरोली, कासणे, पाली, खातीवली, शेणवे आणि विविध ठिकणच्या भरत उबाळे यांच्या शेकडो समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. भरत उबाळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे उपनेते प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी आ. शांताराम मोरे, ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे, माजी आ. पांडुरंग बरोरा, तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे, संजय निमसे, निलेश भांडे, सुधीर तेलवणे, अरुण कासार, आकाश सावंत, विद्या फर्डे, मुकूंद उबाळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश : दरम्यान, कल्याण ग्रामीण पट्ट्यातील कट्टर ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपास्थित प्रवेश केला. यामध्ये मलंग विभागातील ठाकरे गटातील वसारचे शाखा प्रमुख अशोक म्हात्रे, उपविभाग प्रमुख संजय फुलोरे, उप विभाग अधिकारी सुभाष गायकर, श्रीमलंग बजरंगदलाचे प्रमुख राजेश गायकर यांचे सह सर्वश्री हरीष पावशे, रवी शेलार, शिवाजी भोईर, दिपक वायले, जोगेंद्र म्हात्रे, अक्षय म्हात्रे, अतुल म्हात्रे, जय वायले, काळु मढवी आणि ताराचंद सोनावणे यांनी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे .