ठाणे - उल्हासनगरातील कॅम्प चारमधील व्हिनस परिसरात एका वडापावच्या दुकानात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये दुकानमालकाचा जागीच मृत्यू झाला असून, १२ जण होरपळून जखमी झाले आहेत. या जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रवींद्र उर्फ पप्पू गुप्ता असे मृत्यू झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर चार येथील व्हीनस चौक परिसरात जय माताजी नाश्ता हाऊस या नावाने हे वडापाव विक्रीचे दुकान आहे. विशेष म्हणजे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. आजही नेहमीप्रमाणे याभागातही विविध व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने उघडी ठेवली होती. त्याचप्रमाणे या वडापाव सेंटरचे मालक रवींद्र उर्फ पप्पू हे सकाळपासूनच दुकान उघडून ग्राहकांना वडापाव विक्री करीत होते. मात्र, अचानक दुपारच्या सुमाराला या वडापाव दुकानामधील गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने त्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये दुकानाच्या मालकांसह नोकर व काही ग्राहक आगीच्या कचाट्यात सापडून गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात एकच गोधंळ उडाला होता. तर दुकानातील आग कशामुळे लागली हे पाहण्यासाठी काही नागरिक दुकानात गेले असता. पुन्हा एकदा स्फोट होऊन त्यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामध्ये १२ जण अधिक भाजल्याने त्यांना शिवनेरी या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक व पोलीस प्रशासन दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. या घटनेत दुकानदार पप्पू गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला असून, दिनेश गुप्ता, मनोज जैस्वाल, लक्ष्मण, दुलारी, आशिष, राजकुमार प्रजापती व मगरू सोणकर असे १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीत दुकान जळून खाक झाले आहे. तसेच शेजारच्या दुकानांना आगीची झळ पोहोचली आहे. महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच दुकानातून दोन सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.