ठाणे - जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला पायदळी तुडवत नागरिकांनी मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर गर्दी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न केल्याचे दिसून आले. याकडे पोलिसांनी देखील दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - बदलापूर क्षेत्रातील नालेसफाई दावा फोल; काढलेला गाळ पुन्हा नाल्यातच
सध्या करोना काळ असल्यामुळे राज्यात कलम 144, म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे. शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटनस्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असे असताना देखील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर आज सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला न गेल्याचे दिसून आहे. नागरिकांनी मास्कचा वापर देखील टाळल्याचे समजले. या सर्व प्रकारामुळे मुंब्रा येथे जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाईचे आदेश लागू होत नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकीकडे डेल्टा प्लस या करोनाच्या नवीन विषाणूमुळे अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यासह मुंब्रा शहर देखील आहे. असे असताना गेली आठ ते दहा तास या धबधब्यावर लोकांची गर्दी होवून देखील मुंब्रा पोलिसांनी या ठिकाणी साधी भेट दिली नसल्याचे बोलले जात आहे. नागरिक कायदा मोडून महामारीच्या काळात एकत्र जमत असतील आणि करोना संदर्भातले नियम पाळत नसतील तर करोना कधीच संपणार नाही, हे याचे जिवंत उदाहरण आहे.
झोपलेले मुंब्रा पोलीस
या पिकनिक स्पॉटवर एवढी गर्दी होते आणि ही नेहमीच असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मग इथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती कशी मिळत नाही, हा आश्चर्याचा विषय आहे. इथे वाहतूक कोंडीसाठी 24 तांस वाहतूक पोलीस तैनात असतात, तरी या ठिकाणी कारवाई होत नाही, हे विशेष.
हेही वाचा - VIDEO : पाणी पुरवठ्याच्या चौकीतून 'कोब्रा'; तर घराच्या किचनमधून सापाची सुटका