ठाणे - भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दिवसाढवळ्या घरात शिरून दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत १ कोटी ८६ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास जगदीश बळीराम पाटील यांच्या घरात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्याचा गुन्हा दाखल होताच स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा तपास करीत आहेत.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील गोदाम व्यावसायिक जगदीश बळीराम पाटील यांची ठाणे-भिवंडी रस्त्यालगत बी.सी.अपार्टमेंट ही इमारत आहे. तिच्या पहिल्या मजल्यावर ते आपल्या पत्नी वंदना, मुलगा शुभम, मुलगी पल्लवी व वयोवृद्ध आई इंदिरा यांच्यासोबत राहतात. जगदीश पाटील हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सहा वाजता घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे फक्त दरवाजा ओढला. ते बाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले चौघे लुटारू इमारतीच्या जिन्यावरून चढून घरात शिरले. लुटारूंनी घरात प्रवेश करताच पत्नी वंदना व मुलगी पल्लवी झोपलेल्या खोलीत ते शिरले. या दोघींना जगदीश पाटील यांना ठार मारू, अशी धमकी देत पत्नी वंदना यांचे हात दोरीने बांधून मुलीला कपाटाचे लॉकर उघडण्यास सांगितले. त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरांनी ताब्यात घेतली. त्यानंतर मुलगा शुभम झोपलेल्या खोलीत लुटारूंनी मोर्चा वळवला. शुभम झोपेतून जागा होताच त्याचेसुध्दा हात दोरीने बांधून तेथील कपाटातील सर्व ऐवज त्यांनी काढून घेतला. अवघ्या २० मिनिटातच घरातील ६० लाखांची रोकड व १ कोटी २६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे ४२१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरांनी पोबारा केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी श्वान पथक, ठसे तज्ञ आदींच्या पथकांना घटनास्थळी पाचारण केले. याप्रकरणी शुभम पाटील याने दाखल केलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघा लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली आठ तर गुन्हे शाखा भिवंडी, ठाणे, खंडणी विरोधी पथक अशी एकूण बारा पथके नेमण्यात आली आहेत. काल्हेर परिसरातील सर्व सीसीटीव्हींचा तपास घेऊन आरोपींचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.