ठाणे - राज्यसरकारकडून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांविरोधात मीरा भाईंदर हॉटेल बार चालकांनी आंदोलन केले. कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये शिथिलता आणा, अन्यथा आत्महत्या करू, असा इशारा मीरा भाईंदर हॉस्पिटॅलिटी अँड इंटरटेन्मेंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पुत्रण यांनी दिला.
हॉटेल व्यवसायिकांना कोरोनाचा फटका
मीरा भाईंदर हॉस्पिटॅलिटी अँड इंटरटेन्मेंट असोसिएशनने आज काशीमिरा परिसरात शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत आपली मागणी शासनाकडे लावून धरली. आम्हाला लॉकडाऊन मधून सूट द्यावी व आताच आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनुज्ञप्ती फी भरली आहे, आम्हालासुद्धा कुटुंब आहे. आम्हाला लॉकडाऊन मधून बाहेर काढून नियमांनुसार व्यवसाय चालविण्याची परवानगी द्यावी. आम्ही सर्व कोरोना नियमांचे पालन करून हॉटेल चालवू. आम्हाला यातून शासनाने वगळावे, अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करावी लागेल, अशी विनंती असोसिएशनने सरकारला केली.
हेही वाचा - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना लसींचा तुटवडा; लसीकरण केंद्र बंद
मीरा भाईंदर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांनी, तसेच पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करत गुन्हे देखील दाखल केले आहे. हॉटेल चालकांना हॉटेल बार सुरू करण्यास परवानगी द्यावी. आम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन करत व्यवसाय करू, असे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पुत्रण म्हणाले.
हेही वाचा - पत्नीसह बदलापुरकरांनी शहीद जवान सुनील शिंदे यांना साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप