ठाणे - डान्सबारवरील बंदी जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा ऑर्केस्टाबारच्या नावाखाली डान्सबार सुरु झाले. त्यातच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ऑर्केस्टाबारलाही जवळपास ६ महिने टाळे लागले होते. त्यांनतर राज्य सरकराने टाळेबंदीचे नियम शिथिल करताच पुन्हा ऑर्केस्टाबारमध्ये छमछम सुरु झाली. तर पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी बहुतांश बारमालकांनी बारबालांना लपविण्यासाठी छुप्या खोल्या अद्यावत केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीपूर्वी उल्हासनगर येथे महापालिकेने काही डान्सबारच्या छुप्या खोल्यावर होताडा चालवीत बारमधील त्या खोल्या उध्वस्त केल्या. मात्र टाळेबंदीचे नियम शिथिल होताच पुन्हा उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिका हद्दीत आजही पोलिसांची छापेमारी होताच या छुप्या खोल्याचा आसरा बारबाला घेताना दिसत आहे.
डान्सबार बंदीच्या काळात ठाणे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील महापालिकांना डान्स बारमधील बारबालांना लपविण्यासाठी तयार केलेल्या छुप्या खोल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जुलै २०१४ देण्यात आले होते. त्यावेळी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिकेच्या वतीने बारमधील छुप्या खोल्यांचा शोध घेवून त्यावर कारवाईसाठी समिती गठीत करण्यात आली होती. मात्र ७ वर्षाच्या कालावधीत बहुसंख्याने असलेल्या ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बारपैकी केवळ १० ते १२ डान्स बारच्या छुप्या खोल्यावर महापालिकांनी दिखावाची कारवाई केली होती. त्यातच टाळेबंदी उठवल्याने मध्यरात्री उशिरा चालणाऱ्या डान्स बारमध्ये पुन्हा बारबालांना लपविणाऱ्या छुप्या खोल्या गजबल्या असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यापासून निर्माण झाले आहे. त्यातच उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात डान्स बारसह लेडीज बारचे पेव फुटले आहे. या बारवर पोलिसांच्या कारवाई दरम्यान बारबालांना लपविण्यासाठी तळ घरात बेकायदा बांधकाम करून मोठ्या संख्येने छुप्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. टाळेबंदीपूर्वी त्या खोल्यावर केवळ उल्हासनगर महापालिका अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात हातोडा मारून उध्वस्त केल्या होत्या.
तत्कालीन पोलीस आयुक्तांनी कारवाईचे दिले होते निर्देश
बहुतांश शहरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरू असून अश्लील प्रकार सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांच्या छापेमारी वेळी समोर आले आहे. शिवाय हे डान्सबार गुन्हेगारीचे केंद्र बनत आहेत. या ठिकाणी बारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करणे, अश्लील प्रकार सुरू असततात. या बाबत पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. मात्र या गायिकांशिवाय बारबाला त्यांच्या हाती लागत नव्हत्या, त्या कुठे गायब होतात असा असा प्रश्न पोलिसांना पडायचा. अखेर त्या तळ घरातील छुप्या खोल्यांमध्ये जाऊन लापायच्या. विशेष म्हणजे या खोल्या बांधल्या गेल्याचे तत्कालीन पोलीस आयुक्तांना पुन्हा समजताच त्यांनी सर्वात आदी उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला याची माहिती देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २०१९ मध्ये पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर श्रीराम चौकात असलेल्या अँप्पल बार, नाईनटी डिग्री बार, राखी बार, अचल बार, चांदणी बार, हँड्रेट डे बार अशा वादग्रस्त ठरलेल्या बहुतांश डान्सबारमधील छुप्या खोल्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या.
अनधिकृत छुप्या खोल्यांचे जाळे अधिकच पसरले
एकीकडे राज्यातील डान्सबार बंदीबाबत २००५ साली राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१३ ला राज्य सरकारला यश आले होते. मात्र राज्य सरकारच्या डान्सबार बंदीच्या निर्णयाला बार असोसिएशनच्या वतीने सर्वेच्च न्यायालयापर्यत लढा देत, जानेवारी २०१९ रोजी डान्स बारवरील बंदी काही शर्थीवर हटविण्यात आली आहे. मात्र कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील सुरु असलेल्या ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारपर्यंत अनधिकृत छुप्या खोल्यांचे जाळे अधिकच पसरले. यामुळे उशिरा चालणाऱ्या या बारवर त्यावेळी पोलिसांकडून छापेमारी दरम्यान बारबालांना लपविण्यासाठी बहुंताश बारमध्ये छुप्या खोल्या उभारल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले होते. दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्तांनी अशा लेडीज बारची पाहणी करून छुप्या खोल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रामुळे त्यासंबंधी एक पथक गठीत केले होते. तिन्ही माहापालिका पैकी उल्हासनगर माहापालिका कारवाई करीत आहेत. मात्र कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिका दिखाव्याच्या कारवाईपर्यतच राहिल्याचे दिसून येत आहे.
छुप्या खोल्यांचे शोध पथक आजही शांतच
कल्याण डोंबिवली शहर व लगतच्या ग्रामीण परिसरात सुमारे १०० च्या आसपास ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बार आहेत. बर्याच बार मालकांनी महापालिकेची परवानगी न घेता अंतर्गत बेकायेशीरपणे बांधकाम करून बारबाला लपविण्यासाठी छुप्या खोल्या तयार केल्या होत्या. पालिका प्रशासनाने गठीत केलेल्या या समितीने पाहणी करून कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला ६ डिसेंबर २०१४ ला अहवाल सादर केला होता. मात्र ७ वर्षाचा कालवधी उलटूनही ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बारच्या अनधिकृत बाधंकामाचा प्रश्न जैशे थे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ६ महिन्याच्या टाळेबंदीचे निर्णय शिथिल होताच गेल्या काही महिन्यापासून डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्राचा धुमधडाका जोरात सुरू आहे. मात्र बारबालांना लपविणाऱ्या छुप्या खोल्यांचे शोध पथक आजही शांतच आहे. या पथकाने टाळेबंदी पूर्वी कल्याण डोंबिवलीच्या हद्दीतील २८ ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारची प्रत्यक्षात पाहणी केल्याचे पोलीस प्रशासनाला दिलेल्या अहवालात नमूद केले होते. त्यामध्ये काही बारमध्ये स्टोअर रूम, गोडाऊन, महिलांचे मेकअप रूम, विश्रांतीची खोली असल्याचे आढळून आले असल्याचे पोलिसांना सादर केलेल्या आहवाल नमूद केले होते. मात्र कारवाई केली नसल्याचे दिसून आले.
भिवंडीत २३ पेक्षा अधिक डान्स बार
भिवंडी पालिका हद्दीत ४ तर ग्रामीण भागातील मुंबई – नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे १९ डान्स बार आहे. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी डान्स बारचा समावेश आहे. मात्र याठिकाणी पालिकेच्या हद्दीतील बारची पाहणी करून बारच्या छुप्या खोल्यांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे भिवंडी महापालिका हद्दीतील ४ डान्स बार पैकी २ डान्स बार धोकादायक इमारतीमध्ये सुरू आहे. मात्र भिवंडी पालिकेने यावर कारवाई केल्याचे दिसून येत नाही.