ठाणे - सगळीकडे १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगुलांसाठी हा दिवस खास समजला जातो. कॉलेज तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. मात्र, ठाण्यातील तरुण-तरुणींनी हेलपिंग हँड्स युवा फाउंडेशन ग्रुपच्या वतीने 'व्हॅलेंटाईन डे' ऐवजी गरीब मुलांसोबत 'रोटी डे' उत्साहात साजरा करून नवी परंपरा सुरू केली.
ठाण्यातील तरुण-तरुणींनी तीनहात नाका, माजिवडा ब्रिजखाली आणि कापूरबावडी आशापूर मंदिर येथे रोटी डे साजरा केला. 'व्हॅलेंटाईन डे' ऐवजी जी गरीब मुले जेवणापासून वंचित आहेत, अशा मुलांना हेलपिंग हँड्स युवा फाउंडेशन ग्रुपने स्वच्छतेचा पाठ शिकविला. जेवण्यापूर्वी हात धुणे, स्वच्छ कपड्याने पुसणे आदी शिकविण्यात आले. त्यानंतर रोटी डे चा केक कापून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात आला. युथ फाउंडेशनच्या वतीने यावेळी गोर-गरीब लोकांना आणि मुलांना जेवण, केक, चॉकलेट, बिस्कीट आदी वस्तू वाटप करण्यात आली.
या अभिनव उपक्रमास हेल्पिंग हँड्स युवा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आशिष अनिल उज्जैनवाला, उपाध्यक्ष भावेश भोईर, खजिनदार अंजली चौहान, मुख्य सदस्य सोहम चंदनशिवे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. विशेष आखाती म्हणून नॅशनल अँटी करप्शन अॅन्ड ऑपरेशन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, तरुण तरुणी उपस्थित होते.