ठाणे - शहापूर तालुक्यातील वासिंद रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शहापूर तालुक्याचा मुरबाड व कल्याण तालुक्यातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे.
48 तासांपासून पावसाचा धुमाकूळ
४८ तासांपासून शहापूर तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच वासिंद पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या नविन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या एकमेव छोट्या रेल्वे पुलाचा वापर वाहतुकीसाठी वासिंदकर करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जाण्याचा प्रकार घडतो. याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच, संथ गतीने सुरू असलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण कसे होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वाहनचालकांचा जीवावर उदार होऊन पाण्यातून प्रवास
दुसरीकडे पुलाच्या मार्गात पाणी साचल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. पाणी ओसरेपर्यंत वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागले. काही दुचाकीस्वारांनी पाण्यातून आपली गाडी ढकलत मार्ग काढला.
हेही वाचा - Mumbai Rains : कांदिवलीतील महापालिकेच्या पे अँड पार्कमधील 400 वाहनांना जलसमाधी