ठाणे - एकीकडे मुंबईत पावसाने हाहाकार माजवलेला असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण परिसरातील आदिवासी पाड्यांवरील घरांना बसला आहे.
अंबरनाथ तालुक्यात बदलापूरजवळच्या कोंडेश्वर परिसरात बुधवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे या भागातील बेंडशीळ, चाफ्याची वाडीयासह अनेक गावे आणि आदिवासी पाड्यांना मोठा फटका बसला. यात अनेक घरांची पडझड झाली असून काही कच्ची कुडाची घरे तर पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना अक्षरशः खायला अन्नधान्यही राहिलेले नाही. अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत. शिवाय झाडे आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत व्हायला किमान ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता आहे.
स्थानिक आमदार किसन कथोरे आणि अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी आज या नुकसानाची पाहणी केली. जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानेही ठाणे जिल्ह्यात मोठं नुकसान झाले होते. त्यावेळीही ठाणे जिल्ह्याला एक रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर आता दुसऱ्यांदा हे नुकसान झालं असून आता तरी सरकारने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनीही सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - वीज केंद्रात जमिनी गेल्या अन् नशिबी आला संघर्ष; अखेर प्रकल्पग्रस्तांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा