ठाणे: खासदार राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्याविरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितलं.
दोन्ही वकिलांनी मांडली बाजू: भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधिकारी राजेश कुंटे यांनी कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानी बाबतच्या दाव्याची आज (4 मार्च) झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे अॅड. नंदू फडके यांनी बाजू मांडली. तर खासदार राहुल गांधी यांची बाजू अॅड. नारायण अय्यर यांनी मांडली आहे. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, खासदार राहुल गांधी दिल्लीचे रहिवासी असून ते लोकसभा सदस्य आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहेत.
या मुद्द्यावर होणार युक्तिवाद: अॅड. नारायण अय्यर यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत वकील त्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि खटला पुढे चालवतील, या आधारावर कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून आज न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. आता खासदार राहुल गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर 1 एप्रिल 2023 रोजी युक्तिवाद केला जाणार आहे. तसेच सदरच्या पुढील सुनावणीसाठी दोन्ही पक्षकार सज्ज असून या दाव्या बाबात अधिक माहिती पुढील सुनावणीवेळी देणार असल्याचे राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?: भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या २०१४ साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांच्याकडून भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरोधात खासदार राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयात करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी केलेल्या भाषणातील उतारा दाखल केला होता. तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा, असा अर्ज याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता.
राहुल गांधींनी फेटाळले होते आरोप: परंतू १२ जून २०१८ रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच खासदार राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविण्याची मागणी केली. तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविण्यास न्यायालयाकडून मान्यता देण्यात आली होती.
हेही वाचा: Rahul Gandhi : राष्ट्रीय अधिवेशनातून वेळ काढत राहुल गांधी पोहचले थेट लग्नाला अन्...